उलटा चष्मा: सर्किट, ये जात जात करना जरुरी है क्या !

Foto

संजूबाबा, चेहऱ्यावरचे हावभाव न बदलता एकाच शैलीत सगळे डायलॉग बोलणारा बॉलिवूडचा एकमेव अभिनेता ! त्याला अक्टिंग शिकण्याची गरजच पडली नाही. तरीही रसिकांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केले. या मुन्नाभाईने पेशंट अगर मरेला है तो पर्ची भरणा जरुरी है क्या ? असा सवाल करत अख्खा बॉलिवूड इंडस्ट्रीचा माहोल बदलून टाकला. या एकाच डायलॉग पिक्चर हिट झाला. 

संजूबाबाचे आयुष्यही बदललं. सध्याच्या निवडणुकांच्या चित्रपटात याच मुन्ना भाई ने समोर येऊन आता ऐ सर्किट, ये निवडणूक में जात जात करना जरुरी है क्या ? असा डायलॉग एकदा बोलावाच ! जातीचा राजकारणाने निवडणुका बेसूर झाल्यात.  जिकडे तिकडे जातीचे नगारे बडविले जाऊ लागल्याने एकात्मतेचा मंजुळ सूर कालबाह्य झालाय. मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना, या गीतांच्या ओळी बदलून आता मजहब हमे सिखाता आपस मे बैर रखना... अशा झाल्यात ! साने गुरुजींच्या खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या गीताच्या पंक्ती आता विस्मृतीत जात आहेत. कोणत्या जातीची किती मतदार आहेत याचं गणित मांडलं जाऊन  विजयाच्या मशाली पेटवल्या जात आहेत. अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जाती-पातीचे ढोल-नगारे पिटले जाऊ लागल्याने चिंता वाढलीये.

 रंग जातीचे प्रतीक कधीच बनले होते आता काही प्रतिमाही जातीच्या प्रतीक बनून पुढे येत आहेत. फेटे, टोपी, गमचे यांनाही आता जातीची लेबलं चिकटवण्यात आली. प्राण्यांनाही जातीच्या टोळक्यांनी आपसात वाटून घेतलेय. हातात मशाली घेतलेले जातींचे अनुयायांनी रस्त्याने धावताना दिसतात. या मशालींचा केव्हा वनवा बनवून लोकशाही व्यवस्था उद्ध्वस्त करेल, याची चिंता कुणालाच नाही. बरे, या जाती धर्माच्या ठेकेदारांची मोठी गंमत असते. आपल्या मागण्या अथवा प्रश्नाचा चक्क व्यापार मांडून त्यांनी राजकारण्यांच्या हाती आयते कोलीतच दिले. याच बोला चालीवर पाठींब्याचे गणित ठरू लागले. रोजच समाज मंडळ आणि जात पंचायती पाठिंब्याचे पत्र घेऊन दारोदार हिंडताना दिसतात. जिसे बात बनी ही हमारा अब्दुल गणी असे हे गणित आहे. जो अधिक किंमत  त्याला पाठिंबा  असा व्यापार होऊ लागल्याने  निवडणुका व्यापार झाला आहे  घरच्या भाकरी खाऊन आणि रक्ताचे पाणी करून तळमळीने देशासाठी  निवडणुकांच्या रणसंग्राम यात सामील होणारे कार्यकर्ते  नामशेष झालेत.  आता व्यापार झालेल्या निवडणुकीत मतदारही व्यवसायिक बनलेत. त्यामुळेच  सरकार विरोधात  कायम रस्त्यावर उतरणारी  टोळकी गेल्या महिनाभरापासून लुप्त झालीये.  विरोधातल्या घोषणा देणारे तरूण, गाणी गात जनजागरण करणारे, सरकारला सळो की पळो करून सोडणारे सारे गायब आहेत ! याचे उत्तर  व्यवसायिकतेत दडलंय ! एकदा का उमेदवार जाहीर झाला की, आमचं काय बोला तेव्हाच आम्ही बाहेर पडू असा प्रकार होतोय ! कुणीही कुणासाठी फुकटच बोंबलायला तयार नाही.  अशा कोरड्या अवस्थेत लोकशाही पाणी मागते आहे. निवडणूक आयोगही यावर बंधन बंधने घालू शकला नाही. निवडणूक रिंगणातील उमेदवाराने घोषणा करून टाकावी मी निधर्मी म्हणून ? काय व्हायचे ते होईल ! पण एवढी हिंमत कुणी करेल का, हाच प्रश्न आहे. कालच्या सभेतही भाजपने वाह नवाजना स्टेजवर आणून विशिष्ट धर्मियांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केलाच. एक उमेदवार तर सरळ सरळ एका जात वर्गावर मते मागतोय. हैदराबादचा पक्ष याच वळणावर जाईल, सेनेचे हिंदुत्वही त्याच पठडीतले. निवडणुकीत जात धर्माचा वापर केल्यामुळे स्टार प्रचारकांवर बंदी घालण्यात आली. मात्र त्यामुळे काहीही फरक पडणार नाही सर्वच राजकीय पक्षांना जात प्यारी आहे. असेच असेल तर मग लोकसभेच्या निवडणुका तरी घेता कशाला ? जसा आरक्षणाचा प्रश्न सोडविता त्याच प्रकारे हा प्रश्न सोडवा. जातीच्या गणितानुसार प्रतिनिधी निवडून टाका. कुणावरच अन्याय नको. या जातीच्या राजकारणाने निवडणुकांमधील गंमत आणि उत्सुकता हरवत चाललीये.  लोकशाहीच्या या महोत्सवाला जातीच्या गालबोटाने कलुषित केले. गुणवत्तेच्या आधारावर, स्वकर्तुत्वावर आणि स्व- प्रतिमेच्या आधारे निवडणुका जिंकणे आता अवघड बनले. त्यामुळेच समाजाचा देशाचा विचार करणारे लोकप्रतिनिधी आता औषधालाही सापडत नाहीत. ढासळत चाललेला प्रचार इतका हीन पातळीवर येऊन ठेपलाय विचारायलाच नको. सरंजामशाहीकडे होत असलेली ही वाटचाल धोकादायक आहे. म्हणूनच जातीपातीच्या भानगडीत न पडता योग्य उमेदवाराची निवड करणे सशक्त लोकशाहीसाठी गरजेचे बनले. म्हणूनच शिक्षण व्यवस्थेवर कठोर प्रहार करणारा मुन्नाभाई पुन्हा पुन्हा आठवतो. मरणासन्न अवस्थेत पोचलेल्या लोकशाहीला वाचवण्यासाठी अशाच निधर्मी मुन्नाभाई ची गरज आहे. जो कठोर नियमांवर वार करून जातीचा बुरखा टराटरा फाडेल. जातीच गणित मांडून सोंगटी अलगद बिळात ढकलणाऱ्यांना झोडपून काढेल. हा माझा देश जात विरहित धर्मविरहित केवळ भारतीय होण्यासाठी मुन्नाभाईची गरज आहे. म्हणूनच संजूबाबा तू एकदा म्हणच, ऐ सर्किट,  निवडणूक मे जात जात करना जरुरी है क्या ?

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker